सुप्रीम कोर्टाने जोरदार तडाखा दिला आहे. विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांवर शिक्कामोर्तब करण्याचे टाळण्याची तमिळनाडूच्या राज्यपालांची कृती 'घटनाबाह्य' ठरवली आहे. स्टॅलिन पहिली लढाई जिंकले आहेत. पण मुद्दा राज्यपालांना लगाम घालण्यापुरता मर्यादित नाही.
मजबूत केंद्रीय सत्ता की स्वायत्त राज्यांचं फेडरेशन हा वाद संविधान सभेपासून सुरू आहे. संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना हसरत मोहानी यांच्यात संविधान सभेत याच मुद्द्यावर ठिणगी पडली होती.
तेव्हा मुद्दा 'युनियन ऑफ स्टेट्स' की 'फेडरेशन ऑफ स्टेट्स' या शब्द प्रयोगाचा होता. त्याहीपेक्षा मजबूत केंद्रीय सत्तेच्या अंकित राज्यांची स्वायत्तता गमावण्याचा होता. ब्रिटिश पूर्व भारत संस्थानिकांच्या राज्यांनी विभागलेला होता. स्वातंत्र्य मिळालेल्या भारताची एकता आणि अखंडता संविधानाने बांधताना संविधान सभेपुढे संस्थानिकांची राज्यं आणि भाषिक प्रांत यांच्यातील पारंपारिक विभागणी सांधण्याचं आव्हान होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचवेळी नि:संदिग्धपणे स्पष्ट केलं होतं की,
“The Union is not a league of States, united in a loose relationship; nor are the States the agencies of the Union, deriving powers from it. Both the Union and the States are created by the Constitution; both derive their respective authority from the Constitution. The one is not subordinate to the other in its own field... the authority of one is coordinate with that of the other”.
एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, भारतीय संविधानात कुठेही केंद्रीय सत्ता किंवा केंद्र सरकार असा शब्द प्रयोग नाही. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या “निरंकुश’’ केंद्रीय सत्तेला तिलांजली देत भारतीय प्रजासत्ताक निर्माण करताना आपण संघराज्य निर्माण केलं. (Union of States.) राज्यांच्या स्वायत्ततेवर आणीबाणी पूर्व काळात राज्य घटनेतील कलम 356 चा वापर करत अनेकदा हल्ले झाले आहेत. आणीबाणीच्या विरोधात 1977 नंतरच्या जनक्रांतीनंतर मागच्या 37 ते 40 वर्षात असे हल्ले करण्याची हिम्मत अभावानेच झाली. आणीबाणीच्या काळात देश एक तुरुंग बनला होता हे खरं. गेल्या दहा वर्षात राज्य घटनेतल्या मूलभूत गाभ्यावर आणि सांविधानिक संस्थांवर त्याहीपेक्षा अधिक हल्ले झाले. आज व्यक्तींचं मूलभूत स्वातंत्र्य, समता आणि धर्मनिरपेक्षता जितकी पणाला लागली आहे, तितकीच राज्यांची स्वायत्तता संकटात आली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हे संकट ओळखलं आणि त्याला आव्हान दिलं. तामीळनाडूच्या प्रश्नाकडे नेहमीच भाषिक वाद किंवा अलगाववादी दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पण हा दृष्टिकोन खुद्द तामीळनाडूने कधीच निकालात काढला आहे. के. कामराज, सी. एन. अण्णादुराई आणि एम. करुणानिधी यांनी भारताचं संघराज्य हे “Indestructible” असल्याचे आपल्या कृतीतून आणि इतिहासातून दाखवून दिलं आहे.
स्टॅलिन यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. डीलिमिटेशनचा आणि दुसरा हिंदी भाषा सक्तीचा. डीलिमिटेशनचा मुद्दा लोकांच्या लक्षात येतो आणि पटतोही. दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केलं. देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांची लोकसंख्या कमी झाली म्हणून त्यांचा हिस्सा कमी करणं, हे अन्यायकारक आहे. उत्तरेकडच्या लोकांना सुद्धा हे पटावं. पण मुद्दा हिंदी भाषा सक्तीचा आहे.
स्टॅलिन यांनी सत्तेवर आल्यानंतर अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. हिंदी भाषेने उत्तरेकडच्याही 25 पेक्षा जास्त भाषा गिळल्या आहेत. त्या भाषांची स्वायत्तता, स्वतंत्र ओळख आणि भारतीय संस्कृतीत त्यांनी दिलेलं समृद्ध योगदान कसं संपवलं, हा प्रश्न उपस्थित केला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी जनगणेतूनच शेकडो भारतीय भाषांना कसं हद्दपार केलं गेलं, हे यापूर्वीच दाखवून दिलं आहे.
हडप्पा संस्कृतीतील भाषा वाचून दाखवणाऱ्यांसाठी स्टॅलिन यांनी 1 मिलियन डॉलरचे बक्षिस जाहीर केलं आहे. राखीगढीत सापडलेल्या स्त्रीच्या सांगाड्याने "आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका" द्रविड भारताच्या इतिहासाची आहे हे पुन्हा समोर आलं आहे. पेरियार, करुणानिधी ते अगदी स्टॅलिन पर्यंतच्या भूमिकांना राखीगढीतून आणि हडप्पा लिपीतून मोठे समर्थन मिळणार आहे.
स्टॅलिन यांनी हिंदी भाषेला नव्हे तर सक्तीला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील मनसे किंवा शिवसेना एकाबाजूला आणि तामिळनाडूतील द्रविड चळवळ दुसऱ्या बाजूला. यांच्यात मोठं अंतर आहे. तामिळनाडूत हिंसेला आणि द्वेषालाही जागा नाही. मध्ये एकदा दक्षिणेत बिहारींच्या मारहाणीची अफवा पसरली होती. पण स्वत: स्टॅलिन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा तसा आरोप झाला नाही.
हिंदी भाषेने हिंदुस्थानी नाकारली. उत्तरेकडच्या अनेक प्रदेश भाषा संपवल्या. महाराष्ट्राला स्वत:ची मोडी लिपी होती, ती महाराष्ट्रानेच संपवली. ज्या भारतीय भाषांनी आपली जुनी लिपी टिकवली आहे, त्यांचं आणि अगदी मोडी लिपीचंही साधर्म्य दक्षिणेतील तमिळ भाषेशी अधिक आहे.हिंदी आणि देवनागरीने केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तमिळ भाषेतील रुपयाचं चिन्ह पाहिलं की अनेक प्रश्नांचं उत्तर मिळतं.
महाराष्ट्रात देवनागरीने मोडी लिपी गिळून टाकली आणि हिंदुत्ववादी राजकारणाने मराठी भाषिकांच्या राजकारणाचा बळी घेतला. तामिळनाडूत मात्र तसं झालं नाही. कारण तिथलं राजकारण तर्कशुद्ध आणि अवैदिक विचारधारेवर वर उभं आहे. सनातनी हिंदुत्ववादी राजकारणाला पेरियार आणि द्रमुक राजकारणाचा सैद्धांतिक विरोध होता. ही भूमिका स्टॅलिन यांनी कधी पातळ होऊ दिली नाही, ही त्यांची जमेची बाजू आहे.
हिंदी, हिंदू, हिंदुत्व या सावरकरी आणि 'देव'नागरी संकृतायझेशनला स्टॅलिन यांचा विरोध आहे. वन नेशन, वन लँग्वेज, वन कल्चर आणि वन रिलीजन या अजेंड्याने भारताची बहुविविधता संकटात आली आहे. भिन्न वंश, रंग, भाषा, धर्म, जात, वेशभूषा आणि खाद्यसंस्कृती हे, या देशाचं वैशिष्ट्य आहे. खासियत आहे. एक वर्ण, एक वंशांच्या शुद्धतेची भाषा हिटलरने जशी केली होती, तशी गोळवलकरांचीही होती.
भिन्न धर्मीयांनाच नव्हे तर भिन्न भाषा, संस्कृतीच्या सर्व समूहांना एका रंगाने रंगून जा, अन्यथा दुय्यम नागरिकत्व स्वीकारा ही हिंदुत्वाची अट आहे. हिंदुत्व म्हणजे Hinduism नाही. हिंदू ही संकल्पना भूकेंद्रीत आहे. धर्माधारीत आहे. आणि परंपराधारीत सुद्धा आहे. हिंदुत्व मात्र पूर्णत: राजकीय संकल्पना आहे, जी द्वेषावर आणि भेदावर उभी आहे. आरएसएसचे गुरू गोळवलकर त्यांच्या "We or our Nationhood Defined" या पुस्तकात, ते सर्व लोक जे हिंदू वंश, धर्म, भाषा (संस्कृत भाषेचा परिवार) या परिघात येत नाहीत, त्यांना 'गद्दार' आणि 'राष्ट्रीय हिताचे शत्रू' मानतात.
संस्कृत परिवाराच्या बाहेरची भाषा बोलणारे, आर्य वंशाचे नसणारे, ते द्रविड असोत की तामिळ भाषा बोलणारे ते या व्याख्येत येत नाहीत. जणू विंध्य, गोदावरी पलीकडच्या आडव्या रेषेबाहेरील अशा सर्वांना हिंदू राष्ट्राच्या व्याख्येत राष्ट्रीय हितशत्रू मानतात. त्याविरोधात तामिळनाडूची लढाई आहे. संस्कृत परिवाराच्या बाहेर असलेले पाली, मगधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री या प्राकृत परिवाराच्या बाजूने उभे आहेत. म्हणून ती भारतीयत्वाची लढाई आहे. केवळ तामिळनाडूसाठी नाही देशातील सगळ्याच राज्यांसाठी स्टॅलिन मोठी लढाई लढत आहेत.
'दी युनियन ऑफ स्टेटस'चा एल्गार करत राज्यांच्या स्वायत्ततेचा अधिकार सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आहे. देशातील स्वतंत्र ओळख असलेल्या असंख्य भाषिक, वांशिक आणि धार्मिक समूहांसाठी स्टॅलिन यांनी नवी आशा आणि उमेद निर्माण केली आहे.
- कपिल पाटील
माजी सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
kapilhpatil@gmail.com
***
पूर्व प्रसिद्धी - लोकसत्ता (वेब) दि. 17 एप्रिल 2025